Saturday, April 21, 2007

शाळा

सध्या आमच्या मैत्रिणींच्या ग्रुप मधे बऱ्याचदा चर्चेचा विषय असतो - 'शाळा'. बहुतेकींची मुलं सध्या आहेत दोन-अडीच वर्षांची. त्यामुळे त्या pre-school/play group च्या शोधात आहेत. या भागातल्या नावाजलेल्या शाळांबद्द्ल चर्चा रंगात आली होती:
"तिथे admission मिळणं खूप कठीण आहे ग. सहाशे मुलं आहेत waiting list वर".
"पण ती शाळा खरंच चांगली आहे. त्या शाळेत जाणारी ३-४ वर्षांची मुलंही पुस्तकं वाचू शकतात. पहिलीत जायच्या आधी मुलांना बेरीज वजाबाकी करता येते. त्यामुळे अभ्यासात इतरांच्या कायम पुढे राहणार ती!"
"आम्ही form आणायला गेलो होतो तिथे. त्यांनी सांगितलं की तुमचं मूल एका जागी वीस मिनिटं बसू शकत नसेल, तर form भरू नका."
हे सगळं ऐकून मला फार भिती वाटते. फक्त वीस सेकंद एका जागी बसणाऱ्या माझ्या दोन वर्षाच्या मुलासाठी मी आता कुठली शाळा शोधू?

"मी काही महिन्यांनी भारतात परत चाललेय, कायमची!", माझी एक ऑफिसमधली मैत्रीण उत्साहाने सांगत होती, "मला माझ्या मुलांना भारतात जाऊन शाळेत घालायचंय. तिथे आता किती चांगल्या चांगल्या शाळा निघाल्या आहेत! सकाळी सातला त्यांची बस येते. शाळेत अभ्यास, वेगवेगळे खेळ, गाणं, नाटक सगळं काही शिकवतात. त्यांना जेवणही तिथेच देतात. दुपारी त्यांच्याकडून विशेष अभ्यास करून घेतात आणि संध्याकाली सहाला घरी आणून सोडतात." "अकरा तास शाळा? अग मग आपल्या शाळा काय वाईट होत्या? प्रत्येक मुलाला सगळं आलंच पाहिजे असा हट्ट कशासाठी?" -मी. "मला माझी मुलं मागे पडलेली चालणार नाहीत. इतर मुलं अशा शाळांमधे जातात, मलाही माझ्या मुलांना शक्य तितक्या चांगल्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. अशा शाळांमधे जाऊनच तर ती उद्या उत्तम खेळ खेळतील, कलाकार होतील, Berkeley, Stanford मधे जातील..." पुढचं काही माझ्या डोक्यात शिरलं नाही.

माझ्या सुदैवाने मला काम करताना अतिशय गुणी, यशस्वी, प्रेमळ, आनंदी माणसं भेटतात. त्यातली काही नावाजलेल्या शाळा-कॉलेज मधून शिकलेली आहेत, आणि काही आहेत मैलोनमैल चालून खेड्यातल्या शाळेत गेलेली. खेळांचं उत्तम training घेऊन चांगले खेळणारे मित्र आहेत, तसेच रस्त्यावर खेळता खेळता त्यात प्राविण्य मिळवणारेही. कधीही गाणं न शिकता अतिशय उत्तम गाणाऱ्या मैत्रिणी आहेत. या सगळ्यांना भेटून असं वाटतं, की आपण शाळेचा, शिक्षणाचा खूप बाऊ करतो की काय? आणि चांगल्या संधी उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आपण इतर काहीतरी गमावतोय का? शाळा कोणती या गोष्टीला जर खरंच इतकं महत्त्व असतं, तर केवळ या संधी उपलब्ध झालेली माणसंच यशस्वी आणि सुखी झालेली दिसली असती.

शाळेचा विषय निघाला की मी हल्ली जरा गप्पच असते. मग एखादी मैत्रीण विचारते - "तू पण pre-school चा विचार करायला सुरवात केलीस की नाही?". स्वच्छंदीपणे गवतावर बागड्णाऱ्या अपूर्वला बघून माझा विचार अजूनच पक्का होतो. "मी इतक्यात शाळेत नाही घालणार त्याला. Kindergarten पर्यंत त्याच्या day care मधेच त्याला जाऊ देणार." "अगं, मागे पडेल तो शाळेत", इतर मैत्रिणी सल्ला देतात. मी ठामपणे म्हणते - "पुढचं पुढे बघू. सध्या तरी त्याला मजा करू देत!".