Saturday, April 21, 2007

शाळा

सध्या आमच्या मैत्रिणींच्या ग्रुप मधे बऱ्याचदा चर्चेचा विषय असतो - 'शाळा'. बहुतेकींची मुलं सध्या आहेत दोन-अडीच वर्षांची. त्यामुळे त्या pre-school/play group च्या शोधात आहेत. या भागातल्या नावाजलेल्या शाळांबद्द्ल चर्चा रंगात आली होती:
"तिथे admission मिळणं खूप कठीण आहे ग. सहाशे मुलं आहेत waiting list वर".
"पण ती शाळा खरंच चांगली आहे. त्या शाळेत जाणारी ३-४ वर्षांची मुलंही पुस्तकं वाचू शकतात. पहिलीत जायच्या आधी मुलांना बेरीज वजाबाकी करता येते. त्यामुळे अभ्यासात इतरांच्या कायम पुढे राहणार ती!"
"आम्ही form आणायला गेलो होतो तिथे. त्यांनी सांगितलं की तुमचं मूल एका जागी वीस मिनिटं बसू शकत नसेल, तर form भरू नका."
हे सगळं ऐकून मला फार भिती वाटते. फक्त वीस सेकंद एका जागी बसणाऱ्या माझ्या दोन वर्षाच्या मुलासाठी मी आता कुठली शाळा शोधू?

"मी काही महिन्यांनी भारतात परत चाललेय, कायमची!", माझी एक ऑफिसमधली मैत्रीण उत्साहाने सांगत होती, "मला माझ्या मुलांना भारतात जाऊन शाळेत घालायचंय. तिथे आता किती चांगल्या चांगल्या शाळा निघाल्या आहेत! सकाळी सातला त्यांची बस येते. शाळेत अभ्यास, वेगवेगळे खेळ, गाणं, नाटक सगळं काही शिकवतात. त्यांना जेवणही तिथेच देतात. दुपारी त्यांच्याकडून विशेष अभ्यास करून घेतात आणि संध्याकाली सहाला घरी आणून सोडतात." "अकरा तास शाळा? अग मग आपल्या शाळा काय वाईट होत्या? प्रत्येक मुलाला सगळं आलंच पाहिजे असा हट्ट कशासाठी?" -मी. "मला माझी मुलं मागे पडलेली चालणार नाहीत. इतर मुलं अशा शाळांमधे जातात, मलाही माझ्या मुलांना शक्य तितक्या चांगल्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. अशा शाळांमधे जाऊनच तर ती उद्या उत्तम खेळ खेळतील, कलाकार होतील, Berkeley, Stanford मधे जातील..." पुढचं काही माझ्या डोक्यात शिरलं नाही.

माझ्या सुदैवाने मला काम करताना अतिशय गुणी, यशस्वी, प्रेमळ, आनंदी माणसं भेटतात. त्यातली काही नावाजलेल्या शाळा-कॉलेज मधून शिकलेली आहेत, आणि काही आहेत मैलोनमैल चालून खेड्यातल्या शाळेत गेलेली. खेळांचं उत्तम training घेऊन चांगले खेळणारे मित्र आहेत, तसेच रस्त्यावर खेळता खेळता त्यात प्राविण्य मिळवणारेही. कधीही गाणं न शिकता अतिशय उत्तम गाणाऱ्या मैत्रिणी आहेत. या सगळ्यांना भेटून असं वाटतं, की आपण शाळेचा, शिक्षणाचा खूप बाऊ करतो की काय? आणि चांगल्या संधी उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आपण इतर काहीतरी गमावतोय का? शाळा कोणती या गोष्टीला जर खरंच इतकं महत्त्व असतं, तर केवळ या संधी उपलब्ध झालेली माणसंच यशस्वी आणि सुखी झालेली दिसली असती.

शाळेचा विषय निघाला की मी हल्ली जरा गप्पच असते. मग एखादी मैत्रीण विचारते - "तू पण pre-school चा विचार करायला सुरवात केलीस की नाही?". स्वच्छंदीपणे गवतावर बागड्णाऱ्या अपूर्वला बघून माझा विचार अजूनच पक्का होतो. "मी इतक्यात शाळेत नाही घालणार त्याला. Kindergarten पर्यंत त्याच्या day care मधेच त्याला जाऊ देणार." "अगं, मागे पडेल तो शाळेत", इतर मैत्रिणी सल्ला देतात. मी ठामपणे म्हणते - "पुढचं पुढे बघू. सध्या तरी त्याला मजा करू देत!".

Saturday, December 30, 2006

छोटीसी बात..

दर सोमवारी दुपारी ऑफिसमधे जेवायच्या वेळेस मी न चुकता लोकसत्ता चं पान इंटरनेट वर उघडते. देशापासून दूर आल्यावर मराठी पेपर वाचायची चैन फक्त इंटरनेट वरच करता येते. पहिल्यांदा उघडली जाते "चतुरंग" पुरवणी. याच पुरवणीतलं मला खूप आवडणारं एक संगोपनावरचं सदर म्हणजे राजीव तांबे लिखित "छोटीसी बात".

गेलं एक वर्ष मी न चुकता हे वाचतेय. आज यातला निरोपाचा लेख वाचला आणि वाईट वाटलं. "छोटीसी बात" ची मनापासून आवडणारी गोष्ट म्हणजे त्याचं short and sweet स्वरूप. प्रत्येक भागात असायची एखाद्या घरात घडलेली गोष्टं - पालकत्वातल्या चुकांची जाणीव करून देणारी. या चुका सुधारण्यासाठी पालकांना एक गृहपाठ मिळायचा आणि सदराची सांगता व्हायची एका चिनी म्हणीने. छोटीसी बात वाचायला लागल्यापासून मी अपूर्वची प्रत्येक कृती वेगळ्या नजरेने पहायला शिकले. लहान मुलांना चांगलं वागण्याची शिकवण देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. पण आई-बाबांना चांगलं वागायला शिकवणाऱ्या या गोष्टी मनाला स्पर्शून गेल्या.

पुढच्या सोमवारी लोकसत्त उघडल्यावर मला नक्कीच चुकल्यासारखं होणार आहे! याच सदराच्या part-2 ची किंवा पुस्तकाची जरूर वाट पाहीन.

Saturday, May 20, 2006

पडु आजारी...

आज कित्येक दिवसांनी ब्लॉग लिहायला घेतला आणि जाणवलं, की मी जवळजवळ तीन महिने काहीच लिहिलं नाही. मार्च-एप्रिल महिन्यांमधे इथे विक्रमी पाऊस पडला आणि घरी आजारपणांची मालिका सुरू झाली. अपूर्व day care मधे जात असल्यामुळे तिथलं प्रत्येक infection घरी येतं.

आई बाबा होण्याचा खरा अर्थ कळला अपूर्व पहिल्यांदा आजारी पडला तेव्हा. स्वत:चं हसणारं खेळणारं बाळ असं मलूल झालेलं बघणं किती कठीण आहे याची जाणीव झाली. Infant tylenol, humidifier वगैरे अनेक गोष्टी वेळीअवेळी दुकानात जाऊन घाईघाईने आणल्या. रात्री तीन तासाने घड्याळाचा गजर लावून ताप मोजायचा ठरवूनही मी दर तासाला जागी होत होते. साधा सर्दी-खोकला आणि ताप होता, पण कुठला तरी मोठा आजार असल्यासारखी मी चिंता करत होते.

डॉक्टरांची appointment मिळाल्यावर मला बरं वाटलं. वीस-पंचवीस मिनिटं वाट पाहिल्यावर डॉक्टर आले. त्यांनी अपूर्वला एक मिनिट तपासलं आणि "काही विशेष नाही, viral infection आहे, चार दिवसात बरं वाटेल", असं सांगून आम्हाला वाटेला लावलं. आम्ही नवे आई-बाबा आहोत हे त्यांनी ओळखलं होतं आणि ते गालातल्या गालात हसत होते. असं अजून दोन-तीन वेळा झाल्यावर आम्ही थोडे शहाणे झालो. डॉक्टरांची appointment घेण्याआधी थोडी वाट बघू लागलो. काही दिवसांपूर्वी जाणवून गेलं की कपाळाला हात लावून साधारण किती ताप आहे, हे बरोबर ओळखण्याइतके आता आम्ही "आई-बाबा" झालो आहोत.

आता परत हवा खूप छान झाली आहे. त्याबरोबरच कित्येक गोष्टी नव्याने सुरु करायचा (त्यात ब्लॉग लिहिणं पण आलंच) उत्साह मला जाणवतो आहे.

Saturday, February 04, 2006

पसारा

दोन आठवड्यांपूर्वी एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. त्याचं घर सुरेख सजवलेलं होतं. खिडक्यांना छान पडदे होते. सुंदर शो-पीसेसची कलात्मक मांडणी केली होती. भिंतीवर फ्रेम केलेले कुटुंबाचे फोटो लावले होते. घरात एकदम प्रसन्न वाटत होतं. मित्राची अडीच वर्षांची मुलगी जमिनीवर ब्लॉक्सशी खेळत होती. जेवायची वेळ झाली तेव्हा कुणीही न सांगता तिने आपला खेळ आवरला, जागेवर नेऊन ठेवला आणि ती जेवायला येऊन बसली. मला अतिशय कौतुक वाटलं. सुंदर काचेच्या डिशेसमधून आम्ही सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला. हात धुवायला बाथरूममधे गेले, तर तिथे एका काचेच्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्यांमधे एक सुवासिक मेणबत्ती लावली होती. अपूर्वला झोप आली म्हणून मी त्याला झोपायला आतल्या खोलीत घेऊन गेले. घरातल्या छोट्या मुलीची ती खोली असावी. तीही सुंदर सजवलेली. घरात कुठेही पसारा नव्हता!! एव्हाना मला घरातल्या गृहिणीचे फारच कौतुक वाटू लागले होते. बऱ्याच घरात बाहेरची खोली छान आवरलेली असते, पण आतल्या खोलीतही पसारा नाही, आणि तेही घरात लहान मूल असताना, ही गोष्ट मला फारच विशेष वाटली.

घरी आले, तर घराला युद्धभूमीचं रूप आलं होतं. अपूर्वची खेळणी सगळीकडे पसरली होती. निघताना घाई झाल्यामुळे अपूर्वचं एक ओलं दुपटं आणि त्याची खाऊची वाटी टीव्ही समोर तशीच पडली होती. टेबलाखाली (उद्या टाकायच्या!) रद्दीच्या पिशव्यांचा ढीग होता आणि टेबलावर आम्हा दोघांच्या पुस्तकांचा. बाकीच्या खोल्यांमधल्या पसाऱ्याबद्दल तर विचारायलाच नको! मला स्वतःची लाज वाटायला लागली. मी घर आवरायला लागले. अर्धा तास या प्रयत्नात गेल्यावर घराच्या दिसण्यात फारसा काही फरक पडला नव्हता. मी दमले होते, आणि pending कामाच्या यादीतली अनेक महत्त्वाची कामं मला आठवत होती.

छे! कसा काय वेळ मिळतो लोकांना घर इतकं छान ठेवायला! ते दमत नाहीत का कधी? का त्यांच्याजवळ infinite energy असते? त्यांची मुलंही कशी नाही पसारा करत? सासूबाईंना हा विचार बोलून दाखवल्यावर त्यांनी स्पष्टीकरण केलं - "अगं, ज्यांना घर नीटनेटकं, छान सजवून ठेवायची सवय असते, त्यांची मुलंही घर नीट ठेवायला शिकतात." बापरे!! मी दचकलेच! स्वतःला थोडी नीटनेटकेपणाची सवय लावल्याशिवाय काही खरं नाही. नाहीतर अपूर्वला "पसारा आवर" असं कोणत्या तोंडाने म्हणायचं? रविवारी मी कामाला लागले आणि बरंच घर आवरलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी केदार काहीतरी शोधत होता.
"दीपा, माझी टेबलावरची पुस्तकं पाहिलीस का कुठे?"
"हो, अरे मी जागेवर बुकशेल्फ मधे ठेवली आहेत."
"का, आज कोणी येणार आहे का संध्याकाळी?" (केवळ कोणी येणार असेल तरच आमच्या टेबलावरच्या गोष्टी जागेवर जातात!)
"कोणी येणार नाही, पण आपण घर थोडं आवरून नको का ठेवायला?"
"अगं, पण आपण रोज थोडी थोडी वाचतो ती पुस्तकं. रोज कशाला ठेवायची आणि काढायची?"
मनात म्हटलं, बरोबरच आहे. मग रोज वाचली जाणारी पुस्तकं, आत ठेवल्या की कधीही न ऐकल्या जाणाऱ्या सीडीज, प्रत्येक खोलीतली अपूर्वची खेळणी, कधीही फोटो काढता यावे म्हणून वर ठेवलेला camera, स्वयंपाक करता करता बघायची पत्रं अशा अनेक गोष्टींचा पसारा तसाच राहिला.

नंतरचा आठवडाभर हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होता. मुलांना नीटनेटकेपणाची आवड लागावी, म्हणून घर आवरून ठेवावं, का convenience म्हणून पसारा तसाच ठेवावा? पुढच्या weekend ला माझ्या भाच्या घरी आल्या होत्या. त्यांचा खेळ रंगात आला होता. जमिनीवर सगळे खेळ पसरून त्या आणि केदार खेळत होते. आणि अपूर्व त्यांच्याकडे बघून तोंड भरून हसत होता. हे बघून मला मनातल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.

लहानपणी घरी आम्हाला मुक्तपणे खेळता येत असे. "या गोष्टीला हात लावू नका", "तिथे पसारा करू नका", असं आम्हाला कधीच कोणी म्ह्टलं नाही. फारच पसारा केला की मग आई कधीतरी तो आवरायला लावी. पण ह्या मोकळेपणामुळे सगळ्या मित्रमैत्रिणींचा मुक्काम कायम आमच्याकडे असे. फार सजवलेल्या, अनेक नियम असलेल्या घरात जायला नको वाटायचं. नकळत तीच परंपरा आम्हीही चालवत होतो. आमच्याकडे येणारी सगळी लहान मुलं इथे मनमुराद खेळतात आणि घरातल्या पसाऱ्यात थोडी भर टाकून घरी जातात. घर नीटनेटकं ठेऊन मी काय गमावीन, याची जाणीव झाली, आणि माझ्या पसरलेल्या घराचा खूप अभिमान वाटला.

Thursday, February 02, 2006

पिपीप, काऊदादे....

अपूर्व साधारण एक महिन्याचा झाल्यानंतर आम्ही त्याला बाहेर घेऊन जायला सुरुवात केली. सुरवातीला तो फक्त झाडांकडे बघायचा. बाकी कुठेही त्याचं लक्ष नसायचं. त्याला माझ्या एका मैत्रिणीच्या नवर्याने "निसर्गप्रेमी" असं नाव ठेवलं होतं. त्याला stroller मधल्या infant carseat मधे बसायला अजिबात आवडायचं नाही. हातात घेतलं की मात्रं स्वारी खूश!

तो थोडा मोठा झाल्यावर stroller मधे बसायला लागल्यावर त्याला थोडं लांब घेऊन जाता येऊ लागलं. तोपर्यंत त्याला गाड्या बघण्याची आवड लागली होती. मग आम्ही घराजवळच्या एका चौकात गाड्या म्हणजेच पिपीप बघायला जाऊ लागलो. कोणतीही गाडी दिसली, की अपूर्व मोठ्ठे डोळे करून, मान १८० अंशातून वळवून, ती गाडी जाईपर्यंत तिच्याकडे बघत राहतो. गाडी जर स्त्री चालवत असेल, तर तीही हमखास अपूर्वकडे वळून बघते, हसते. त्या रस्त्याने जाणार्या एका बसचा ड्रायव्हर अपूर्वचा मित्र झाला आहे. आम्ही रस्त्यात दिसलो, की तो क्षणभर थांबून अपूर्वला टा-टा करतो. पण ह्या चाहत्यांकडे अपूर्व बघेल तर शपथ! त्याचं लक्षं गाडीवरून हलत नाही. मग मी त्याला एकदा शिष्ट म्हणून टाकते :)
गाड्या बघून घरी परत येईपर्यंत सूर्यास्ताची वेळ जवळ येते. मग अपूर्वचं लक्षं जातं आकाशात. कावळ्यांची शाळा सुट्लेली असते. ते एकमेकांना बोलावून घरी जायच्या तयारीत असतात. मान वर करून अपूर्व काऊदादे (हे आम्हीच केलेलं काऊदादा शब्दाचं अनेकवचन) बघत असतो. त्यातच एखादा काऊदादा जर आमच्या समोरून उडत गेला, तर मग काही विचारू नका. अपूर्वचा चेहरा एकदम उजळतो. एकाएकी पन्नास-शंभर काऊदादे घराकडे प्रयाण करतात. अपूर्व शक्य तेवढे मोठ्ठे डोळे करून मान वळवून वळवून त्यांच्याकडे बघत राहतो. काऊदादे घरी गेले, की मग त्याला भुकेची जाणीव होते, आणि मग आम्ही घराकडे कूच करतो.
खरं सांगू, बाहेर फिरायला जायच्या या वेळेची मीही अपूर्व इतकीच वाट बघते. पिपीप, काऊदादे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेण्यासाठी आवश्यक असलेली अपूर्वची नजर मला नुकतीच त्याने देऊ केली आहे.

Wednesday, February 01, 2006

अपूर्वाई

१८ जून २००५ ला अपूर्व चा जन्म झाला आणि केदारच्या आणि माझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरु झालं. Pregnancy च्या काळात आणि नंतरही babycenter कडून येणारया emails वाचत होते. या emails मधे Tending Violet नावाचं एक खूप छान parenting journal सापडलं. त्याबद्द्ल मी अधूनमधून केदारशी बोलत असे. केदार माझ्या खूप मागे लागला, की तू पण असं मराठीत का नाही लिहीत? ह्या blog ची प्रेरणा त्याने दिली आणि "अपूर्वाई" हे नावही त्यानेच सुचवलं.

Violet ही अपूर्वपेक्षा साधारण महिनाभराने मोठी असेल. त्यामुळे या सदरात वर्णन केलेले अनुभव मलाही येतच होते. म्हणूनच, या सदरातले विचार अमेरिकन संदर्भ वगळून सुद्धा मनाला स्पर्शून गेले.

Tending Violet वाचताना एक गोष्ट सारखी जाणवते आणि ती म्हणजे लेखिकेचा प्रांजळपणा आणि परखडपणा. स्वतःच्या अनेक चुका, संभ्रम, अडचणी याबद्द्ल तिने अगदी मोकळेपणाने लिहिलं आहे. इतक्या मोकळेपणे स्वत:चे विचार मांडण्याची कल्पना माझ्या भारतीय संस्कारात वाढलेल्या मनाला जड वाटते आहे. त्यातच पहिल्यांदाच blog लिहीत असल्यामुळे मनात बराच गोंधळ आहे. तरी तुमच्या सूचना जरूर कळवा.