Thursday, February 02, 2006

पिपीप, काऊदादे....

अपूर्व साधारण एक महिन्याचा झाल्यानंतर आम्ही त्याला बाहेर घेऊन जायला सुरुवात केली. सुरवातीला तो फक्त झाडांकडे बघायचा. बाकी कुठेही त्याचं लक्ष नसायचं. त्याला माझ्या एका मैत्रिणीच्या नवर्याने "निसर्गप्रेमी" असं नाव ठेवलं होतं. त्याला stroller मधल्या infant carseat मधे बसायला अजिबात आवडायचं नाही. हातात घेतलं की मात्रं स्वारी खूश!

तो थोडा मोठा झाल्यावर stroller मधे बसायला लागल्यावर त्याला थोडं लांब घेऊन जाता येऊ लागलं. तोपर्यंत त्याला गाड्या बघण्याची आवड लागली होती. मग आम्ही घराजवळच्या एका चौकात गाड्या म्हणजेच पिपीप बघायला जाऊ लागलो. कोणतीही गाडी दिसली, की अपूर्व मोठ्ठे डोळे करून, मान १८० अंशातून वळवून, ती गाडी जाईपर्यंत तिच्याकडे बघत राहतो. गाडी जर स्त्री चालवत असेल, तर तीही हमखास अपूर्वकडे वळून बघते, हसते. त्या रस्त्याने जाणार्या एका बसचा ड्रायव्हर अपूर्वचा मित्र झाला आहे. आम्ही रस्त्यात दिसलो, की तो क्षणभर थांबून अपूर्वला टा-टा करतो. पण ह्या चाहत्यांकडे अपूर्व बघेल तर शपथ! त्याचं लक्षं गाडीवरून हलत नाही. मग मी त्याला एकदा शिष्ट म्हणून टाकते :)
गाड्या बघून घरी परत येईपर्यंत सूर्यास्ताची वेळ जवळ येते. मग अपूर्वचं लक्षं जातं आकाशात. कावळ्यांची शाळा सुट्लेली असते. ते एकमेकांना बोलावून घरी जायच्या तयारीत असतात. मान वर करून अपूर्व काऊदादे (हे आम्हीच केलेलं काऊदादा शब्दाचं अनेकवचन) बघत असतो. त्यातच एखादा काऊदादा जर आमच्या समोरून उडत गेला, तर मग काही विचारू नका. अपूर्वचा चेहरा एकदम उजळतो. एकाएकी पन्नास-शंभर काऊदादे घराकडे प्रयाण करतात. अपूर्व शक्य तेवढे मोठ्ठे डोळे करून मान वळवून वळवून त्यांच्याकडे बघत राहतो. काऊदादे घरी गेले, की मग त्याला भुकेची जाणीव होते, आणि मग आम्ही घराकडे कूच करतो.
खरं सांगू, बाहेर फिरायला जायच्या या वेळेची मीही अपूर्व इतकीच वाट बघते. पिपीप, काऊदादे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेण्यासाठी आवश्यक असलेली अपूर्वची नजर मला नुकतीच त्याने देऊ केली आहे.

5 comments:

Sumedha said...

दीपा, माझ्या एका मैत्रिणीच्या लहान मुलीला असं वाटतं की ती जशी मोठी होते, तशी तिची आई लहान होते! त्या नियमानुसार, तुझी आत्ता कुठे लहान व्हायला सुरुवात झालीये, तेव्हा तुला अजून बरीच काही नवीन "नजर" यायची आहे ;-)

Deepa said...

खरं आहे :)! हे लहान होणं मात्र खूप आनंददायी आहे. त्याबद्द्ल पुन्हा कधीतरी नक्की लिहीन.

Nandan said...

तुम्हांला यातून मिळणारा आनंद नक्कीच 'अपूर्व' असला पाहिजे. छान लेख आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

Unknown said...

i can't read hindi but this looks great.

Kanak said...

दीपाजी, आपका ब्लॉग पढ़ कर बड़ा आनंद मिला। हम अंग्रजी में लिखते आए हैं। इसे देख कर कुछ बहुत हिन्दी में भी लिख लिया :-) अभी शुरुआत ही है।

कनक