Saturday, February 04, 2006

पसारा

दोन आठवड्यांपूर्वी एका मित्राकडे जेवायला गेलो होतो. त्याचं घर सुरेख सजवलेलं होतं. खिडक्यांना छान पडदे होते. सुंदर शो-पीसेसची कलात्मक मांडणी केली होती. भिंतीवर फ्रेम केलेले कुटुंबाचे फोटो लावले होते. घरात एकदम प्रसन्न वाटत होतं. मित्राची अडीच वर्षांची मुलगी जमिनीवर ब्लॉक्सशी खेळत होती. जेवायची वेळ झाली तेव्हा कुणीही न सांगता तिने आपला खेळ आवरला, जागेवर नेऊन ठेवला आणि ती जेवायला येऊन बसली. मला अतिशय कौतुक वाटलं. सुंदर काचेच्या डिशेसमधून आम्ही सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला. हात धुवायला बाथरूममधे गेले, तर तिथे एका काचेच्या भांड्यात गुलाबाच्या पाकळ्यांमधे एक सुवासिक मेणबत्ती लावली होती. अपूर्वला झोप आली म्हणून मी त्याला झोपायला आतल्या खोलीत घेऊन गेले. घरातल्या छोट्या मुलीची ती खोली असावी. तीही सुंदर सजवलेली. घरात कुठेही पसारा नव्हता!! एव्हाना मला घरातल्या गृहिणीचे फारच कौतुक वाटू लागले होते. बऱ्याच घरात बाहेरची खोली छान आवरलेली असते, पण आतल्या खोलीतही पसारा नाही, आणि तेही घरात लहान मूल असताना, ही गोष्ट मला फारच विशेष वाटली.

घरी आले, तर घराला युद्धभूमीचं रूप आलं होतं. अपूर्वची खेळणी सगळीकडे पसरली होती. निघताना घाई झाल्यामुळे अपूर्वचं एक ओलं दुपटं आणि त्याची खाऊची वाटी टीव्ही समोर तशीच पडली होती. टेबलाखाली (उद्या टाकायच्या!) रद्दीच्या पिशव्यांचा ढीग होता आणि टेबलावर आम्हा दोघांच्या पुस्तकांचा. बाकीच्या खोल्यांमधल्या पसाऱ्याबद्दल तर विचारायलाच नको! मला स्वतःची लाज वाटायला लागली. मी घर आवरायला लागले. अर्धा तास या प्रयत्नात गेल्यावर घराच्या दिसण्यात फारसा काही फरक पडला नव्हता. मी दमले होते, आणि pending कामाच्या यादीतली अनेक महत्त्वाची कामं मला आठवत होती.

छे! कसा काय वेळ मिळतो लोकांना घर इतकं छान ठेवायला! ते दमत नाहीत का कधी? का त्यांच्याजवळ infinite energy असते? त्यांची मुलंही कशी नाही पसारा करत? सासूबाईंना हा विचार बोलून दाखवल्यावर त्यांनी स्पष्टीकरण केलं - "अगं, ज्यांना घर नीटनेटकं, छान सजवून ठेवायची सवय असते, त्यांची मुलंही घर नीट ठेवायला शिकतात." बापरे!! मी दचकलेच! स्वतःला थोडी नीटनेटकेपणाची सवय लावल्याशिवाय काही खरं नाही. नाहीतर अपूर्वला "पसारा आवर" असं कोणत्या तोंडाने म्हणायचं? रविवारी मी कामाला लागले आणि बरंच घर आवरलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी केदार काहीतरी शोधत होता.
"दीपा, माझी टेबलावरची पुस्तकं पाहिलीस का कुठे?"
"हो, अरे मी जागेवर बुकशेल्फ मधे ठेवली आहेत."
"का, आज कोणी येणार आहे का संध्याकाळी?" (केवळ कोणी येणार असेल तरच आमच्या टेबलावरच्या गोष्टी जागेवर जातात!)
"कोणी येणार नाही, पण आपण घर थोडं आवरून नको का ठेवायला?"
"अगं, पण आपण रोज थोडी थोडी वाचतो ती पुस्तकं. रोज कशाला ठेवायची आणि काढायची?"
मनात म्हटलं, बरोबरच आहे. मग रोज वाचली जाणारी पुस्तकं, आत ठेवल्या की कधीही न ऐकल्या जाणाऱ्या सीडीज, प्रत्येक खोलीतली अपूर्वची खेळणी, कधीही फोटो काढता यावे म्हणून वर ठेवलेला camera, स्वयंपाक करता करता बघायची पत्रं अशा अनेक गोष्टींचा पसारा तसाच राहिला.

नंतरचा आठवडाभर हा प्रश्न माझ्या डोक्यात घोळत होता. मुलांना नीटनेटकेपणाची आवड लागावी, म्हणून घर आवरून ठेवावं, का convenience म्हणून पसारा तसाच ठेवावा? पुढच्या weekend ला माझ्या भाच्या घरी आल्या होत्या. त्यांचा खेळ रंगात आला होता. जमिनीवर सगळे खेळ पसरून त्या आणि केदार खेळत होते. आणि अपूर्व त्यांच्याकडे बघून तोंड भरून हसत होता. हे बघून मला मनातल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.

लहानपणी घरी आम्हाला मुक्तपणे खेळता येत असे. "या गोष्टीला हात लावू नका", "तिथे पसारा करू नका", असं आम्हाला कधीच कोणी म्ह्टलं नाही. फारच पसारा केला की मग आई कधीतरी तो आवरायला लावी. पण ह्या मोकळेपणामुळे सगळ्या मित्रमैत्रिणींचा मुक्काम कायम आमच्याकडे असे. फार सजवलेल्या, अनेक नियम असलेल्या घरात जायला नको वाटायचं. नकळत तीच परंपरा आम्हीही चालवत होतो. आमच्याकडे येणारी सगळी लहान मुलं इथे मनमुराद खेळतात आणि घरातल्या पसाऱ्यात थोडी भर टाकून घरी जातात. घर नीटनेटकं ठेऊन मी काय गमावीन, याची जाणीव झाली, आणि माझ्या पसरलेल्या घराचा खूप अभिमान वाटला.

2 comments:

Sumedha said...

दीपा, ब्लॉगली नाहीस बर्‍याच दिवसात? अपूर्व लिहू देत नाही का :-)

rohinivinayak said...

deepa, malahi tuzyapramanech vatate ki agadi satat chhan ghar asave. pan mala te thevayla ajibaat jamat nahi. ichchha aste pan maza navara mhanto ki ghar aahe mhanje pasara ha thodphar asnarach. pan itaranchi taptip ghare pahun na mala khup guilty vatate. chhan lihile aahes. agadi mazay manatlech janu.